लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरुष खात्यावर? मोठा खुलासा

मुंबई (दि. १५ मे): महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण योजने’च्या नावाखाली
मोठ्या प्रमाणावर सायबर फसवणूक उघडकीस आली आहे. जुहू पोलिसांनी केलेल्या तपासात
तब्बल २,५०० हून अधिक बनावट बँक खाती उघडण्यात आल्याचे
निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असून,
मुख्य सूत्रधार प्रतीक पटेल (गुजरात) येथील असून तो सध्या फरार आहे.
पोलिस तपासात समोर आले आहे की, या टोळीने लाडकी बहीण
योजनेसाठी सामान्य नागरिकांची 'केवायसी' माहिती गोळा करून त्यांचा गैरवापर केला. विशेष म्हणजे, पुरुषांची केवायसी घेऊन महिला लाभार्थ्यांच्या नावावर खाती उघडून कोट्यवधी
रुपयांचे व्यवहार करण्यात आले. या प्रकरणानंतर राज्य महिला व बाल विकास विभाग
खडबडून जागा झाला आहे. विभागाने एक कोटी लाभार्थ्यांच्या अर्जांची युद्धपातळीवर
पडताळणी करण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना दिले आहेत. दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना
याआधीच योजना मंजूर झालेली असून उर्वरित अर्जांची चोख तपासणी केली जाणार आहे. महत्वाची
बाब म्हणजे, योजनेच्या अंमलबजावणीत आतापर्यंत विभागाकडून
कोटेकोर पडताळणी न झाल्याने लाखो रुपये अपात्र व्यक्तींच्या बँक खात्यांत जमा झाल्याचेही
समोर आले आहे. यामध्ये नामसाधर्म्याचा (समान नाव असलेले पुरुष) गैरफायदा घेऊन
योजनेचा लाभ घेतला गेला असल्याची शक्यता आहे. महिला व बाल विकास विभागाने या
पार्श्वभूमीवर योजनेच्या लाभार्थ्यांची संपूर्ण पारदर्शक व काटेकोर पडताळणी
करण्याचे निर्देश दिले आहेत. लवकरच सर्व जिल्हा प्रशासन याबाबत कार्यवाही सुरु
करणार आहे.