'लाडकी बहीण' योजनेत मोठा बदल; आता मिळणार केवळ ५०० रुपये

मुंबई १५ एप्रिल २०२५:- राज्यातील अनेक महिलांना एकाच वेळी दोन योजनांचा लाभ मिळत असल्याची बाब समोर आल्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 'लाडकी बहीण' आणि 'नमो शेतकरी सन्मान निधी' या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता 'लाडकी बहीण' योजनेतून १५०० ऐवजी फक्त ५०० रुपये दिले जातील. राज्य सरकारच्या नियमानुसार, कोणत्याही व्यक्तीला फक्त एका वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेता येतो. मात्र प्रत्यक्षात अनेक महिलांना एकाच वेळी दोन्ही योजनांचे पैसे मिळत होते. यामुळे शासनाने छाननी केली आणि त्यानंतर संबंधित महिलांच्या 'लाडकी बहीण' योजनेच्या हप्त्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यातील सुमारे ८ लाख महिलांना 'नमो शेतकरी योजने'तून दरमहा १००० रुपये सन्मान निधी मिळतो. त्यामुळे अशा लाभार्थींना ‘लाडकी बहीण’ योजनेतून मिळणाऱ्या रकमेत कपात करण्यात येऊन आता फक्त ५०० रुपयेच दिले जातील. हा निर्णय दुहेरी लाभ टाळण्यासाठी घेण्यात आला असून, यामुळे शासनाच्या आर्थिक भारातही थोडीशी घट होण्याची शक्यता आहे.