सोलापुरात कुंकुमार्चन सोहळा उत्साहात; महिलांचा जवानांसाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ उपक्रम

सोलापूरशुक्रवार पेठेतील श्री रामलिंग चौंडेश्वरी देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त सोलापुरात कुंकुमार्चन कार्यक्रम उत्साहात पार पडला. शेकडो महिलांनी सहभाग घेतलेल्या या धार्मिक सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’ हा उपक्रम होता. या उपक्रमांतर्गत महिलांनी सीमेवरील जवानांना पाठवण्यासाठी कुंकू संकलित केले. यासोबत "आम्ही माता भगिनी तुमच्या पाठीशी आहोत" असा भावनिक संदेशही जवानांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. काश्मीर व दिल्लीतील लष्कर कार्यालयांकडे हे कुंकू पाठवण्यात आले आहे. कार्यक्रमाचे पौराहित्य संजय हंचाटे व वेदमूर्ती शिवशरण म्हेत्रे यांनी केले. यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. काशिनाथ रुगे, सचिव गुरुनाथ निंबाळे, तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यात्रा उत्सवातील इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये:

  • पहाटे नवदांपत्यांच्या हस्ते महारुद्राभिषेक व महाआरती
  • सकाळी १० वाजता सुहासिनी ओटी भरण व महाप्रसाद

या कार्यक्रमात माजी सैनिक आणि वीरपत्नींचीही विशेष उपस्थिती होती. माजी सैनिक अरुणकुमार तळीखेडे, अंबान्ना माळी, अप्पासाहेब पुजारी, मल्लिनाथ हणमशेट्टी, राजकुमार जमखंडी यांच्यासह वीरपत्नी वीठाबाई हेडे, शोभा पारलेलू, जयश्री पाटील आदी उपस्थित होते. या उपक्रमाने धर्म आणि देशभक्तीचा सुंदर संगम साधला गेला असून, जवानांसाठी जनतेच्या मनात असलेला आदर आणि प्रेम व्यक्त झाले.