कुलदीप यादवने रिंकू सिंहला लगावल्या दोन थप्पडा! व्हिडिओ व्हायरल

दिल्ली, २९ एप्रिल २०२५ – दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात मंगळवारी
झालेल्या आयपीएल सामन्यानंतर एक अनपेक्षित प्रसंग घडला. सामन्यानंतर मैदानात
दिल्लीचा गोलंदाज कुलदीप यादव याने केकेआरचा फलंदाज रिंकू सिंहला सलग दोन थप्पडा
मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर बीसीसीआयकडे
कुलदीपवर बंदी घालण्याची मागणी होत आहे.
व्हिडिओमध्ये कुलदीप, रिंकू आणि इतर काही खेळाडू सामन्यानंतर हास्यविनोद करताना दिसतात. याचदरम्यान कुलदीप यादव रिंकूच्या गालावर एक थप्पड मारतो, त्यानंतर दुसरी थप्पडही मारतो. पहिल्यांदा हसणारा रिंकू दुसऱ्या थप्पडेने संतापतो आणि कुलदीपकडे रागाने पाहतो. व्हिडिओत आवाज नसल्यामुळे नेमकं काय बोलणं झालं ते समजू शकत नाही. मात्र, दुसऱ्या थप्पडीनंतर रिंकूचा चेहरा रागाने भरलेला दिसतो. ही घटना हरभजन सिंग आणि श्रीशांत यांच्यात २००८ मध्ये घडलेल्या थप्पड प्रकरणाची आठवण करून देणारी असली, तरी या घटनेच्या स्वरूपात काहीसा विनोदी किंवा मोकळ्या संवादाचा सुर दिसून येतो. तरीदेखील सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कुलदीपच्या कृतीवर नाराजी व्यक्त करत बीसीसीआयने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. केकेआरने मिळवला विजय, दिल्ली लटकली दरम्यान, सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सवर १४ धावांनी विजय मिळवला. दिल्लीकडून फाफ ड्युप्लेसिस आणि अक्षर पटेल मैदानात असताना सामना त्यांच्या बाजूने झुकतोय असे वाटत होते. मात्र, सुनील नारायणने दोन षटकांत ३ विकेट्स घेत सामना फिरवला, तर वरुण चक्रवर्तीने सलग दोन विकेट्स घेऊन विजय 'केकेआर'च्या झोळीत टाकला. या पराभवामुळे दिल्लीचा संघ गुणतालिकेत १२ गुणांवरच अडकून राहिला असून, त्यांचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग आणखी कठीण झाला आहे.