बेंगलोर उद्यान एक्सप्रेसच्या जनरल बोगीत प्रवास्यावर चाकूने हल्ला ; जीवे मारण्याचा प्रयत्न

मुंबई - बेंगलोर उद्यान एक्सप्रेसच्या जनरल बोगी मधून प्रवास करणाऱ्या प्रवास्यावर धावत्या गाडीत चाकूने हल्ला करुन गंभीर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न अन्य एका प्रवास्याकडून करण्यात आला. ही घटना दि. ११ फेब्रुवारी रोजी मुंबई - बेंगलोर उद्यान एक्सप्रेसच्या जनरल बोगीत दुपारी ३ वा  अनगर- मोहोळ च्या दरम्यान धावत्या ट्रेनमध्ये घडली.जखमी प्रवासी तुषार घनश्याम इंदापुरे वय ३२ रा. विमान नगर पुणे, हल्ली रा.सोलापुर यांनी कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिसांत मारेकरी शशीकुमार व्यंकटरामा वय ३२ रा. रामसागर कसबा हूबळी ( कर्नाटक ) याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी तुषार इंदापुरे हा त्याच्या राहात्या घरी सोलापुर येथे कार्यक्रम असल्या कारणाने मंगळवार दि.११ फेब्रुवारी रोजी  पुणे ते सोलापुर असा मुंबई - बेंगलोर उद्यान एक्सप्रेसच्या जनरल बोगी मधून प्रवास करत होता. सदर गाडी अनगर ते मोहोळ च्या दरम्यान दु.३ वा सुमारास  फिर्यादी इंदापुरे बाथरुमला जात असताना अन्य प्रवासी शशीकुमार व्यंकटरामा वय ३२ रा. रामसागर कसबा हूबळी बेळगंबा याने  धक्का मारला त्यावर इंदापुरे यांनी धक्का का मारला असे विचारले असता तु कोण विचारणारा म्हणून सदर शशीकुमार याने फिर्यादीस चापट मारली आणि पुढे जाऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यावर चापट मारून शिवीगाळ का करतोस असे म्हणाल्यावर शशीकुमार याने त्याच्या सॅक मधील चाकू सारखे हत्यार काढून फिर्यादीच्या पोटावर ,गळ्यावर वार करुन गंभीर जखमी करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी आरडाओरड होताच प्रवासी व गाडीतील चहा विक्रेत्यांनी सदर मारेकऱ्याला पकडले. सोलापुर येताच पोलिसांनी मारेकऱ्याला  फिर्यादीसमोर नाव पत्ता विचारून ताब्यात घेतले व फिर्यादीवर प्राथमिक उपचार करुन त्याला पुढील उपचारासाठी छ.शिवाजी रुग्णालय सोलापुर येथे दाखल केले. त्यानंतर फिर्यादी याने दिलेल्या जबाबावरुन शशीकुमार व्यंकटरामा वय ३२ रा. रामसागर कसबा हूबळी बेळगंबा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो.उपनिरीक्षक सलीम मुलाणी हे करीत आहेत. विनायक दीक्षित. कुर्डूवाडी