गाडीचे हप्ते न फेडल्याने तिघांकडून कर्जदाराच्या मुलाचे अपहरण

 

सोलापूर:गाडीचे हप्ते न फेडल्याच्या कारणावरून फायनान्सच्या तिघा वसुली एजंटांनी मुलाचे अपहरण करून दहा हजार रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. याबाबत सुरेखा धीरज रंगदाळ (वय 47, रा. गीतानगर, वालचंद महाविद्यालयाजवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शकील नजीर अहमद बोडे (वय 29, रा. 70 फूट रोड), इमरान नसीम शेख (रा. शास्त्रीनगर) व देवा जाधव (रा. रामवाडी) या फायनान्सच्या वसुली एजंटांविरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रंगदाळ यांनी डफरीन चौकातील ए.यू. फायनान्स बँकेतून गाडीसाठी कर्ज घेतले होते. गाडीचे हप्ते न फेडल्याच्या कारणावरून ए. यू. फायनान्स बँकेच्या तिघा वसुली एजंटांनी फिर्यादी रंगदाळ यांच्या घरासमोर उभ्या केलेल्या बलेनो कार (एमएच १३ इसी ००46) मध्ये फिर्यादीच्या मुलाला जबरदस्तीने गाडीतून अपहरण केले आणि आरटीओ ऑफिस जवळील एका खासगी गोडाऊनमध्ये त्यास नेले. त्या ठिकाणी त्याला जबरदस्तीने डांबून ठेवून शिवीगाळ करून कार जबरदस्तीने ठेवून घेतली व तुम्हाला गाडी देणार नाही काय करायचे ते करा अशी दमदाटी केली आहे. तसेच मुलाला सोडण्याच्या बदल्यात दहा हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. दरम्यान जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिला संशयितांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास फौजदार मोरे हे करीत आहेत.