केतन हत्याकांडात नवा ट्विस्ट; साखरपुड्यापूर्वी चेतनसोबत उदयपूर ट्रिप, शॉपिंगसाठी घेतले १ कोटी?

पुण्यातील उद्योजक केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. पोलिस तपासानुसार, आरोपी सिया गोयल ही केतन अग्रवाल यांच्याशी साखरपुडा होण्यापूर्वी तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी याच्यासोबत उदयपूरला फिरायला गेली होती. या दौऱ्याशी संबंधित प्रवासाची नोंद, डिजिटल पुरावे आणि इतर कागदपत्रांची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांचा यावर्षी फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला होता. मात्र, तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या नात्यामागे पूर्वनियोजित कट असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.

साखरपुड्यापूर्वी उदयपूर दौऱ्याची चौकशी

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी काही मित्रांसोबत साखरपुड्याच्या काही आठवडे आधी उदयपूरला गेले होते. या प्रवासादरम्यानच्या हालचाली, डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहारांचा तपास पोलिस करत आहेत.

'केतनशी लग्न करण्याची इच्छा नव्हती'

पोलिसांच्या चौकशीत सियाने केतनशी लग्न करण्याची इच्छा नसल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार, लग्न मोडल्यास बदनामी होईल, या भीतीतून सिया आणि चेतन यांनी केतनचा काटा काढण्याचा कथित कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

शॉपिंगच्या नावाखाली १ कोटी रुपये?

तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाचा दावा समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सियाने शॉपिंगच्या कारणावरून केतन अग्रवाल यांच्याकडून सुमारे १ कोटी रुपये घेतले होते. हे पैसे चेतन चौधरीला दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपासानुसार, या पैशांच्या मदतीने चेतनला स्वतःचा व्यवसाय उभारायचा होता. आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतर काही वर्षांनी दोघांनी विवाह करण्याचा कथित बेत आखल्याचा संशयही पोलिस तपासत आहेत.

लोहगडावर क्राइम सीन रिक्रिएशन

तपासाचा भाग म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी सिया गोयलला लोहगड किल्ल्यावर नेऊन घटनास्थळी क्राइम सीन रिक्रिएशन केले. १८ जून रोजी नेमका घटनाक्रम कसा घडला, याची पुनर्रचना करून पुरावे अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांच्या आरोपानुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी मिळून केतन अग्रवाल यांना लोहगड किल्ल्यावरील खोल दरीत ढकलून हत्या केल्याचा आरोप आहे.

 साखरपुड्यापूर्वी सिया आणि चेतन उदयपूरला गेल्याची माहिती तपासात समोर.

शॉपिंगच्या नावाखाली केतनकडून सुमारे १ कोटी रुपये घेतल्याचा पोलिसांचा दावा.

 लोहगड किल्ल्यावर आरोपीकडून क्राइम सीन रिक्रिएट करण्यात आला.