कर्नाटक मुस्लिम आरक्षणावरून संसदेत प्रचंड गोंधळ; दोन्ही सभागृह तहकूब

नवी दिल्ली, २४ मार्च २०२५ : कर्नाटक राज्य सरकारने सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावरून संसदेत आज सोमवारी प्रचंड गोंधळ झाला. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होताच, ट्रेझरी बेंचच्या सदस्यांनी या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली. यामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करावे लागले. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसवर आरोप करत म्हटले की, "काँग्रेस मुस्लिम आरक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेले संविधान का बदलत आहे? याचे उत्तर द्यावे." यावर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तर दिले की, "देशाचे संविधान बाबासाहेबांनी बनवले आहे आणि ते कोणीही बदलू शकत नाही. संविधान सुरक्षित राहावे यासाठी आम्ही भारत जोडो यात्रा काढली." यानंतर रिजिजू यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यांनी आरोप केला की, "बाबासाहेबांनी नाकारलेले मुस्लिम लीगचे धोरण काँग्रेस पक्ष राबवत आहे. हे संविधान आणि बाबासाहेब दोघांनाही कलंकित करणारे आहे." त्यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेले विधान वाचून दाखवले आणि काँग्रेस अध्यक्षांना या प्रकरणी स्पष्टीकरण देण्याचे आव्हान दिले. गोंधळानंतर लोकसभेचे कामकाज पहिल्यांदा दुपारी १२ वाजेपर्यंत, नंतर दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. राज्यसभेचे कामकाजही दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.