श्री च्या घरी कन्यारत्न शशांक केतकरच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन

मुंबई : काहीही हा श्री ... या डायलॉगमुळे ओळखला जाणारा आणि मराठी मालिकांमधून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या अभिनेता शशांक केतकरच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने व त्याची पत्नी प्रियांकाने मॅटर्निटी फोटोशूट करत लवकरच आई-बाबा होणार असल्याचे सांगितले होते. आता त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी गुडन्यूज शेअर केली आहे. प्रियंकाने गोंडस बाळाला जन्म दिला असून, या जोडप्याला कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. प्रियंका व शशांक दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. अभिनेत्याने इंस्टाग्रामवर सुंदर व्हीडिओ शेअर करत लेकीचे नाव देखील सांगितले आहे. ‘आता खऱ्या अर्थाने कुटुंब पूर्ण झालं. घरात लक्ष्मी आली…’, असे म्हणत शशांकने सोशल मीडियावर व्हीडिओ शेअर केला आहे. या जोडप्याने त्यांच्या लेकीचं नाव ‘राधा’ असे ठेवले आहे. शशांकने इंस्टाग्राम स्टोरीजवर एक मजेशीर फोटो देखील शेअर केला आहे. यामध्ये शशांक भिंतीला टेकून उभा आहे व त्यावर ‘हम दो हमारे दो’ असे लिहिलेले आहे. सोबतच, त्याने प्रियांका, शशांक, ऋग्वेद, राधा अशी कुटुंबातील चौघा सदस्यांची नावे लिहिली आहेत.