तस्करीच्या सोन्यासह कन्नड अभिनेत्री रान्या राव अटकेत

बंगळुरू :  कन्नड चित्रपटसृष्टीत खळबळ माजवणाऱ्या घटनेत अभिनेत्री रान्या रावला तब्बल १४. किलो सोन्यासह अटक करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३ मार्च रोजी ही कारवाई केली.

रान्या राव ही कर्नाटक पोलिस गृहनिर्माण महामंडळाचे पोलिस महासंचालक (डीजीपी) रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. तिने ‘माणिक्य’ आणि ‘पत्की’ या कन्नड चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

तस्करीचा तपशील:

🔹 १४. किलो सोने दुबईहून भारतात आणताना ताब्यात

🔹 डीआरआय अधिकाऱ्यांनी विमान उतरण्याच्या आधीच सापळा रचला
🔹 गेल्या १५ दिवसांत चार वेळा दुबईला प्रवास केल्याचे उघड
🔹 १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

डीआरआय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रान्या राव दुबईहून एमिरेट्सच्या विमानाने भारतात परतली होती. तस्करीच्या संशयावरून आधीच तिच्यावर नजर ठेवण्यात आली होती. ती विमानतळावर उतरल्यावर तिला रोखून झडती घेतली असता तिच्याकडे मोठ्या प्रमाणात सोने आढळून आले. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोन्याच्या तस्करीत रान्या राव सहभागी असल्याची माहिती डीआरआयच्या दिल्ली पथकाला मिळाली होती. त्यामुळे ३ मार्च रोजी, अधिकारी विमानतळावर तिच्या आगमनाच्या दोन तास आधीच पोहोचले होते आणि तिला अटक करण्यात आली.