कच्छमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के; ४.४ रिश्टर स्केल तीव्रता, सुदैवाने हानी नाही

कच्छ (गुजरात): गुजरातमधील कच्छ परिसरात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र विभागानुसार, या भूकंपाची तीव्रता ४.४ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्र कच्छच्या पृष्ठभागापासून सुमारे १० किलोमीटर खोल असल्याची माहिती देण्यात आली आहे. पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याने अनेक नागरिकांची झोपमोड झाली. काही सेकंदांसाठी जमिनीला हादरे बसल्याचे जाणवले. अनेक घरांमध्ये पंखे, बेड आणि इतर हलक्या वस्तू हलल्याचे नागरिकांनी सांगितले. भीतीपोटी काही नागरिक घराबाहेर आले होते. सुदैवाने, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेच्या नुकसानीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. भूकंपानंतर काही काळ कच्छ परिसरात भीतीचे वातावरण होते. मात्र प्रशासनाने तातडीने परिस्थितीवर लक्ष ठेवत नागरिकांना घाबरू नये, असे आवाहन केले आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून आफ्टरशॉक्सची शक्यता लक्षात घेऊन सतर्कता ठेवण्यात येत आहे.

भरूचमध्येही यापूर्वी भूकंपाचे धक्के
याआधी पाच दिवसांपूर्वी, २० डिसेंबर रोजी भरूच जिल्ह्यात पहाटे ४:५६ वाजता सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या भूकंपाचे केंद्र भरूचपासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर जंबुसरजवळ होते. या घटनेनंतरही नागरिकांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

भूकंपाच्या दृष्टीने कच्छ संवेदनशील
गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (GSDMA) माहितीनुसार, गेल्या २०० वर्षांत गुजरातमध्ये नऊ मोठे भूकंप झाले असून त्यातील बहुतांश भूकंप कच्छ परिसरात झाले आहेत. कच्छ प्रदेश हा सक्रिय भूकंपीय पट्ट्यात असल्याने तो भूकंपप्रवण मानला जातो. 
विशेषतः २००१ मधील कच्छ (भुज) भूकंपाच्या आठवणी आजही नागरिकांच्या मनात ताज्या आहेत. भचौजवळ झालेल्या ६.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या त्या विनाशकारी भूकंपात सुमारे १३,८०० लोकांचा मृत्यू झाला होता, तर १.६७ लाखांहून अधिक लोक जखमी झाले होते. त्यामुळे आजच्या सौम्य भूकंपानंतरही नागरिकांमध्ये भीतीची भावना दिसून आली.