ज्योती मल्होत्राला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक

नवी दिल्ली :- पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या हरियाणाच्या ज्योती मल्होत्रा हिच्याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका वृत्तानुसार, केरळ सरकारने पर्यटनाच्या प्रचारासाठी तिला आणि आणखी ४१ सोशल मीडिया इन्फ्लुएंसरना अधिकृतपणे नियुक्त केले होते. माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांनुसार, केरळ सरकारने या मोहिमेसाठी त्यांच्या राहण्याचा, प्रवासाचा आणि इतर खर्चाचा संपूर्ण निधी उचलला होता. ज्योती मल्होत्रा ही ‘ट्रॅव्हल विथ जिओ’ नावाचे यूट्यूब चॅनल चालवत होती. केरळ दौऱ्यात तिने कोची, अलाप्पुझा, मुन्नार आणि कोझिकोड या पर्यटन स्थळांना भेट देत व्लॉग तयार केले होते.
दरम्यान, ज्योतीची न्यायालयीन कोठडी १४ दिवसांनी
वाढवण्यात आली असून पुढील सुनावणी आज (७ जुलै) होणार आहे. तिला
१६ मे रोजी अटक करण्यात आली होती. तिच्यावर ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट आणि भारतीय
दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपासात उघड
झाले आहे की, ज्योतीचे कनेक्शन पाकिस्तानच्या गुप्तचर एजंट
शाकीर ऊर्फ जट्ट रंधावा याच्याशी होते. शाकीर हा दहशतवादी समर्थित हेरगिरी
नेटवर्कचा भाग असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणातून पंजाब पोलिसांनी
आणखी एका मोठ्या हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश केला, ज्यात रूपनगरचा
युट्यूबर जसबीर सिंग याचे नावही पुढे आले आहे. जसबीर ‘जानमहल’ नावाचे यूट्यूब चॅनल
चालवत असून तोही पाकिस्तानी नागरिक एहसान-उर-रहीम ऊर्फ दानिश यांच्याशी संपर्कात
होता. दानिश हा पूर्वी भारतातील पाकिस्तान उच्चायुक्तालयात अधिकारी होता, परंतु त्याला नंतर हद्दपार करण्यात आले. या
प्रकरणातील चौकशी केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणा आणि राज्य पोलिसांकडून वेगाने
सुरू आहे.