दंगलींवरुन जयंत पाटील यांचा जोरदार हल्लाबोल

मुंबई : - राज्यात मागील काही काळात घडलेल्या दंगलींवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना त्यांनी नागपूरच्या दंगलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जयंत पाटील म्हणाले, "राज्यात मागील काही काळात १२ दंगली घडल्या आहेत. नागपूरमध्ये घडलेली दंगल ही पूर्वनियोजित कट असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. जर हा कट सरकारला आधीच माहिती होता, तर मग त्यावेळी प्रशासन काय करत होते? नागपूर हे शांत स्वभावाच्या लोकांचे शहर असूनही तिथे अशी परिस्थिती का निर्माण झाली?" पाटील यांनी सरकारवर आरोप करत म्हटले, "कामरावर केस झाली, पण सोलापूरकरांवर केस का झाली नाही? महाराजांवर आणि इतर महापुरुषांवर अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई का केली नाही?" याशिवाय, पाटील यांनी सरकारकडून काही विशिष्ट लोकांना मोठ्या प्रमाणावर सुरक्षा देण्यावरही प्रश्न उपस्थित केला. "सभागृहाशी संबंध नसलेल्या लोकांना पाच-दहा सुरक्षा रक्षक का दिले जातात?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जयंत पाटील यांनी नामदेव ढसाळ यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अधिकाऱ्याचा मुद्दाही सभागृहात उपस्थित केला. "एका अधिकाऱ्याने नामदेव ढसाळ कोण आहेत, असा प्रश्न विचारला. अशा अधिकाऱ्याला तातडीने अटक करावी आणि त्यांना ढसाळांचे साहित्य वाचायला द्यावे," असे पाटील म्हणाले. शेवटी, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणीही त्यांनी सरकारला धारेवर धरले. "या प्रकरणी पोलिसांची जबाबदारी निश्चित आहे. सोमनाथच्या आईला न्याय मिळणार का?" अशी मागणी त्यांनी केली.