जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
.jpeg)
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी पक्षाने शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. ते येत्या 15 जुलै रोजी जयंत पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारतील अशी माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा गत 10 जून रोजी वर्धापन दिन साजरा झाला होता. त्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. शरद पवारांनी मला अनेक वर्षे संधी दिली. तब्बल 7 वर्षांचा कालावधी दिला. पण आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे. त्यामुळे मी सर्वांसमोर मला मदमुक्त करण्याची विनंती करत आहे शेवटी हा पक्ष पवार साहेबांचा आहे. त्यांनी या प्रकरणी योग्य तो निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतरच राजकीय वर्तुळात ते कोणत्याही वेळी प्रदेशाध्यक्ष पद सोडतील असे मानले जात होते. त्यानुसार आज त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.