जपानमध्ये भीषण अपघात: एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची साखळी टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
जपान: जपानमध्ये वर्षाअखेरीच्या सुट्ट्यांच्या काळात खराब
हवामान अनेकांसाठी जीवघेणे ठरले आहे. राजधानी टोकियोपासून सुमारे १६० किलोमीटर
अंतरावर असलेल्या गुन्मा प्रीफेक्चरमधील कान-एत्सु एक्सप्रेसवेवर शुक्रवारी भीषण
अपघात झाला. बर्फवृष्टीमुळे रस्ता घसरल्याने तब्बल ५० हून अधिक वाहने एकमेकांवर
आदळली, त्यानंतर काही वाहनांना आग लागली. जपानी पोलिसांच्या माहितीनुसार, या अपघातात ७७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून २६ जण जखमी झाले आहेत.
जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. अपघातात अनेक
ट्रक आणि कारचा समावेश असून, एक वाहन घसरल्यानंतर मागून
येणाऱ्या गाड्या वेगाने एकामागून एक धडकत गेल्याने ही साखळी टक्कर झाली. आगीमुळे
परिसरात एकच खळबळ उडाली आणि एक्सप्रेसवेचा मोठा भाग तातडीने बंद करण्यात आला. वर्षाच्या
अखेरीस सुट्ट्या सुरू असल्याने अनेक नागरिक प्रवासासाठी बाहेर पडले होते. यामुळे
महामार्गावर आधीच मोठी वाहतूक कोंडी होती. त्यातच जोरदार बर्फवृष्टीमुळे परिस्थिती
आणखी बिकट झाली. शुक्रवारी रात्री उशिरा बर्फवृष्टीचा इशाराही प्रशासनाकडून
देण्यात आला होता.घटनेनंतर सात तासांहून अधिक काळ बचावकार्य सुरू होते. पोलिसांनी
स्पष्ट केले की आगीमुळे वेगळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अपघातग्रस्त वाहने हटवण्याचे काम अद्याप सुरू असून एक्सप्रेसवेचे काही भाग
अजूनही बंद आहेत. या घटनेचा तपास जपानी पोलिसांकडून सुरू असून, नागरिकांना खराब हवामानात अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने
केले आहे.