लाडकी बहीण योजनेचा गोंधळ: पैसे खात्यात न जमा झाल्याने जळगावमध्ये महिलांचा संताप; महिला व बाल विकास कार्यालयात धडक
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभर चर्चेत
असतानाच, जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. योजनेअंतर्गत मिळणारे
पैसे खात्यात जमा न झाल्याने शेकडो संतप्त महिलांनी आज जळगावच्या महिला व बाल
विकास कल्याण केंद्रावर धडक दिली. महिलांनी थेट कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांना जाब
विचारल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नेमका गोंधळ काय?
राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. जळगाव जिल्ह्यात सुमारे १० लाखांहून अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. डिसेंबर महिन्याचा हप्ता संक्रांतीपूर्वी मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, जळगावमधील सुमारे १ लाखाहून अधिक महिलांच्या खात्यात अद्याप एक रुपयाही जमा झालेला नाही. गेल्या दीड वर्षांपासून नियमितपणे मिळणारा लाभ अचानक बंद झाल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. KYC चा जाच आणि तांत्रिक अडचणी या गोंधळाबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, KYC प्रक्रियेत झालेल्या त्रुटी आणि तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आंदोलक महिलांचा सवाल आहे की, “आम्ही सर्व कागदपत्रे दिली, KYC पूर्ण केली, तरीही आमचे पैसे का अडवले?” KYC करूनही लाभ न मिळाल्याने महिलांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट कार्यालयात धडक दिली.
१८१ हेल्पलाईनवर संपर्कच होत नाही?
काही दिवसांपूर्वी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी
अडचणी असल्यास १८१ हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. मात्र, जळगावमधील महिलांचा आरोप आहे की,
“१८१ नंबरवर फोनच लागत नाही. सरकार फक्त घोषणा करतंय, प्रत्यक्षात मदत मिळत नाही.”
अधिकाऱ्यांची धावपळ, आंदोलनाचा इशारा
शेकडो महिला एकाच वेळी कार्यालयात पोहोचल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. रखडलेले पैसे लवकरात लवकर खात्यात जमा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. आता सुमारे १ लाख लाभार्थी महिलांना त्यांचे हक्काचे पैसे कधी मिळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.