मुंबईत जैन समाजाचा जीवदया मोर्चा; कबुतरखाना बंदीविरोधात आझाद मैदानात उपोषण
आज सकाळी कुलाबा जैन मंदिरातून निघालेला मोर्चा आझाद
मैदानात दाखल झाला असून, तिथेच उपोषण आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
या आंदोलनात जैन समुदायातील मोठ्या संख्येने बांधव आणि पक्षीप्रेमी सहभागी झाले
आहेत. धर्मगुरू निलेशचंद्रजी महाराज यांनी सरकारला थेट इशारा देत सांगितले —
“जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही
जीवदयासाठी लढू.”
मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांचा मुद्दा लक्षात घेऊन कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने दादर कबुतरखाना बंद केला. मात्र, याचा तीव्र विरोध जैन समुदायाने केला. त्यांनी ताडपत्री आणि शेड लावून पुन्हा कबुतरखाना सुरू करण्याचा प्रयत्नही केला होता. या आंदोलनाच्या विरोधात मराठी एकीकरण समितीने देखील मोर्चा काढला होता. दरम्यान, मुंबई महापालिकेने कबुतरखान्यासाठी चार पर्यायी जागा सुचवल्या आहेत — वरळी जलाशय, अंधेरी पश्चिम लोखंडवाला बॅक रोडवरील खारफुटी परिसर, ऐरोली-मुलुंड जकात नाका परिसर आणि बोरिवली पश्चिमेतील गोराई मैदान. महापालिकेने स्पष्ट केलं आहे की या ठिकाणी फक्त सकाळी ७ ते ९ या वेळेतच कबुतरांना दाणे देता येतील. जैन समुदायाचा दावा आहे की, कबुतरांना दाणा देणं हे त्यांच्या धार्मिक परंपरेचा भाग आहे आणि “जीवदयाचं तत्त्व” हे जैन धर्माचं मूळ आहे. त्यामुळे या निर्णयावर पुनर्विचार व्हावा, अशी त्यांची मागणी आहे.