शेजाऱ्याकडे घराची किल्ली देणं पडलं महागात; 58 तोळे दागिने लंपास
.jpeg)
पुणेः गावी जाताना शेजाऱ्याकडे घराची किल्ली देणे एका व्यक्तीला चांगले महागात पडले आहे. संबंधित व्यक्तीच्या घरातून तब्बल 58 तोळे सोन्याचे दागिने लंपास झाले आहेत. याप्रकरणी गौरव गेरा (वय 37, रा. वाघोली) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गौरव यांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार पोलिसांनी एका दाम्पत्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 28 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर 2024 या कालावधीत वाघोलीतील रोहन अभिलाषा सोसायटीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेरा हे दिवाळी सणानिमित्त कुटुंबीयांसह गावी उत्तर प्रदेशमध्ये गेले होते. गेरा यांनी गावी जाताना झाडाला पाणी घालण्यासाठी आपल्या घराची किल्ली शेजारी राहणाऱ्या एका दाम्पत्याकडे दिली होती. दरम्यान, फिर्यादी गावाहून परत आल्यानंतर एके दिवशी घरातील दागिने तपासले असता, ते मिळून आले नाहीत. घराचा कडी-कोयंडा देखील तुटलेला नव्हता. तसेच, चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला नाही. त्यामुळे त्यांनी संशयावरून किल्ली ठेवलेल्या दाम्पत्याच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दिली. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अहिरे करत आहेत.