इस्रोचे PSLV C62 मिशन ‘फेल’ ! ‘अन्वेषा’ उपग्रह कक्षेत तैनात करण्यात अयशस्वी, रॉकेटने बदलली दिशा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांचे २०२६ मधील पहिले कक्षीय अभियान PSLV-C62 अपेक्षेप्रमाणे प्रक्षेपित झाले, मात्र उपग्रह तैनातीच्या टप्प्यावर या मोहिमेला अपयश आले. आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या पहिल्या प्रक्षेपण पॅडवरून हे रॉकेट अवकाशात झेपावले होते. या मोहिमेचा प्रमुख घटक EOS-N1 ‘अन्वेषा’ हा अत्याधुनिक हायपरस्पेक्ट्रल उपग्रह होता. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) यांनी विकसित केलेला हा उपग्रह प्रगत पृथ्वी निरीक्षण आणि संरक्षणविषयक अनुप्रयोगांसाठी डिझाइन करण्यात आला होता.

तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक अडथळा

प्रक्षेपणानंतर रॉकेटचे पहिले आणि दुसरे टप्पे सुरळीत पार पडले. मात्र तिसऱ्या टप्प्यात (PS3) तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचे समोर आले. यामुळे रॉकेटने अपेक्षित मार्ग बदलल्याची माहिती इस्रोने दिली आहे. इस्रो प्रमुखांनी याबाबत निवेदन देताना सांगितलेतिसऱ्या टप्प्यात एक समस्या उद्भवली असून रॉकेटने दिशा बदलली. उपलब्ध डेटाचे विश्लेषण सुरू असून लवकरच अधिकृत माहिती दिली जाईल.”

मिशन कंट्रोलमध्ये शांतता

इस्रोच्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टनुसार“PSLV-C62 मोहिमेच्या PS3 टप्प्याच्या शेवटी अडचण आली आहे. सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे.” तिसऱ्या टप्प्यानंतर डेटा विलंब झाल्याने मिशन कंट्रोल सेंटरमध्ये काही काळ शांतता होती. चौथा टप्पा सुरू झाल्याचे संकेत मिळाले असले तरी त्यानंतर उपग्रह वेगळा झाला की नाही, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळू शकली नाही.

इस्रोची चौकशी सुरू

EOS-N1 ‘अन्वेषा’ उपग्रह तैनात झाला नसल्याचे प्राथमिक निष्कर्ष असून, या मोहिमेतील अपयशाचे नेमके कारण शोधण्यासाठी इस्रोने सखोल तांत्रिक तपास सुरू केला आहे. भविष्यातील PSLV मोहिमांसाठी या घटनेतून महत्त्वाचे धडे घेतले जातील, असे इस्रोने स्पष्ट केले आहे.