IRCTC कडून प्रवाशांकडून 2,619 कोटींची वसुली; कन्व्हिनियन्स फीच्या नावाखाली लूट?

पुणे : पुण्यातील उद्योजक प्रफुल्ल सारडा यांनी माहिती अधिकार कायद्यातून (RTI) मागविलेल्या माहितीतून एक मोठा खुलासा समोर आला आहे. भारतीय रेल्वेची ऑनलाइन तिकीट सेवा देणारी संस्था IRCTC (Indian Railway Catering and Tourism Corporation) ने 2022-23 ते 2024-25 या तीन आर्थिक वर्षांत 'कन्व्हिनियन्स फी'च्या नावाखाली एकूण ₹2,619 कोटी प्रवाशांकडून वसूल केल्याचे उघड झाले आहे.

काय आहे 'कन्व्हिनियन्स फी'?

IRCTC वेबसाइट किंवा अ‍ॅपद्वारे ऑनलाइन तिकीट बुकिंग करताना प्रत्येक तिकिटावर कन्व्हिनियन्स फी (सोयीसाठी शुल्क) आकारली जाते. ही फी साधारणपणे ₹15 ते ₹30 दरम्यान असते, मात्र तिकीट रद्द केल्यानंतरही ही रक्कम परत दिली जात नाही.

आरटीआयमधून समोर आलेली आकडेवारी:

  • 2022-23: ₹800 कोटी
  • 2023-24: ₹900 कोटी
  • 2024-25: ₹919 कोटी
    एकूण: ₹2,619 कोटी

IRCTC कडून सांगण्यात आले की, ही फी संकेतस्थळाच्या देखभाल, प्रणालीच्या कार्यक्षमतेसाठी आणि डिजिटल सेवांसाठी वापरली जाते. मात्र, ही रक्कम नेमकी कशी आणि कुठे खर्च होते, याचा तपशील देण्यात IRCTC अपयशी ठरली आहे. प्रवाशांमध्ये संतापाचा सूर सामान्य प्रवाशांना यामुळे आर्थिक फटका बसत असल्याने नाराजी पसरली आहे. "तिकीट रद्द केल्यावर सगळे पैसे परत मिळतात, पण ही कन्व्हिनियन्स फी मात्र जात नाही. मग हे कोणत्या सुविधेसाठी?" असा सवाल अनेक प्रवाशांनी उपस्थित केला आहे. सरळसरळ लूट” – प्रवाशांची प्रतिक्रिया पुण्यातील एका प्रवाशाने प्रतिक्रिया देताना म्हटले, "पहिल्याच तिकीटाचे दर जास्त आहेत, त्यात पुन्हा वेगळी फी लावणं म्हणजे प्रवाशांची सरळसरळ लूट आहे." काहींनी या वसुलीची चौकशी व्हावी आणि पारदर्शकता राखावी, अशी मागणी केली आहे.