इराणची तीव्र प्रतिक्रिया: अमेरिकन नागरिक आणि सैनिक आमच्या टार्गेटवर

अमेरिकेने आज (२१ जून) इराणमधील तीन
महत्त्वाच्या अणुस्थळांवर हवाई हल्ला केला. हे हल्ले फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील अणुकेंद्रांवर करण्यात आले असल्याचे
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. इराणच्या सरकारी
टीव्हीने अमेरिकेच्या या कृतीवर तीव्र प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,
"तुम्ही सुरु केलय, संपवू आम्ही".
यापुढे पश्चिम आशियातील प्रत्येक अमेरिकन नागरिक आणि लष्करी
कर्मचारी आमच्या लक्ष्यावर असतील, असा इशारा इराणने दिला
आहे. इराणच्या संरक्षण मंत्र्यांनीही अमेरिकेला पूर्व इशारा दिला होता. सध्या
पश्चिम आशियातील ४०,००० अमेरिकन सैनिक थेट इराणच्या
क्षेपणास्त्रांच्या रेंजमध्ये आहेत, असेही त्यांनी सांगितले.
अणुस्थळांना काय नुकसान झाले?
इराणी प्रसारमाध्यमांनी सांगितले की, फोर्डो अणुसुविधेच्या प्रवेशद्वारातील बोगद्यांना काहीसे
नुकसान झाले आहे, मात्र मुख्य अणुकेंद्र सुरक्षित आहे. इतर
ठिकाणच्या हल्ल्यांबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा:
"इराणला शांततेचा मार्ग
स्वीकारावा लागेल, अन्यथा आणखी घातक हल्ले होतील,"
असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. अजूनही सर्व लक्ष्यांवर हल्ला
झाला नसल्याचे सांगत, भविष्यातील कारवाया अधिक भयंकर असतील,
असेही ते म्हणाले.
इस्रायलचा पाठिंबा:
या कारवाईनंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी
अमेरिकेचे आभार मानले. त्यांनी म्हटले की, "ही कारवाई इतिहास बदलेल."
इस्रायलनेही इराणविरोधात दीर्घकालीन लढ्यासाठी सज्ज असल्याचे
सांगितले आहे.