दहा लाखांची फसवणूक; लोणावळा-खोपोली परिसरात गंडा

सोलापूर: दहा लाख रुपये गुंतवल्यास दुप्पट परतावा मिळेल, असे आमिष दाखवून विशाल पाटील ऊर्फ नाना साळवे याने अजित विनायक चव्हाण आणि सुनीता अनिल कांबळे यांच्या मदतीने एका व्यक्तीची फसवणूक केली. अकलूज पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रणव (फलटण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ मार्च रोजी दुपारी दोनच्या सुमारास लोणावळा येथे बोलावून त्यांनी खोपोली येथील मॅजिक पॉइंटवर नेले. अडीच वाजता पोहोचल्यानंतर अजित चव्हाण आणि विशाल पाटील यांनी कापडी पिशवीतील दहा लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी ‘आमचा माणूस आला असून दहा मिनिटांत जाऊन येतो’ असे सांगून तेथून निघून गेले. दहा मिनिटांनंतर साध्या वेशातील एमएच १२ पासिंग असलेली कार, ज्यावर ‘महामार्ग पोलिस’ असे लिहिले होते, त्या कारमधून चौघे जण आले आणि विशाल पाटील याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी तक्रारदाराला गाडी पुढे हलवण्यास सांगितले. मात्र, काही वेळ वाट पाहूनही विशाल पाटील परतला नाही. या तिघांनी मिळून दहा लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद प्रणव यांनी अकलूज पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.