वैराग येथील ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातातील जखमी ' त्या ' तरुणीचा अखेर मृत्यू ; ग्रामस्थांमध्ये संताप

वैराग : येथे दुचाकीवरून पुतनीसह घरी निघालेल्या चुलत्याला मळी घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्याने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय मुलीच्या डोक्यास गंभीर मार लागून डावा कान तुटुन, उजवे पायाचे मांडीवरुन ट्रॅक्टरचे चाक गेल्याने पंधरा दिवसांपूर्वी गंभीर जखमी केले होते. दुचाकी चालक चुलता जखमी झाले होते. गंभीर जखमी 'त्या ' तरुणीवरती सोलापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी उपचार चालू असताना मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरून तिचा मृत्यू झाला. रोडवरील वाढलेले अतिक्रमण , वाहन चालवताना येणारे अडथळे यामुळे वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. ऋतुजा अजित मोहिते ( वय १९ ) रा. वैराग असे ' त्या ' मृत्यूशी झुंज देणाऱ्या मुलीचे नाव आहे. हा अपघात शुक्रवार दि. ३१ रोजी दुपारी चार वाजणेचे सुमारास हिंगणी रोड वैराग येथील रुबाब हेअर सलून दुकानासमोर रोडवर वैराग ( ता. बार्शी ) येथे घडला होता. याबाबत जखमी मुलीचे चुलते अतुल अशोक मोहिते ( वय ४४ ) रा. दत्तनगर ( वैराग ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक आकाश महादेव मोरे रा. सासुरे यांचेवर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. याबाबत अधिक माहिती अशी की मुलीचे चुलते अतुल मोहिते हे दुचाकी क्र. एम.एच. १३ इ.एच .४९१३ वर त्यांची पुतणी ऋतुजा सह जात होते. तेव्हा ट्रॅक्टर नंबर एम.एच. १३ डी . टी. ०३१८ दोन बिगर नंबर ट्रॉलीचा चालक आकाश मोरे याने त्याचे ताब्यातील सदर ट्रॅक्टर भरधाव वेगात रोडचे परीस्थितीकडे दुर्लक्ष करुन हयगयीने, अविचाराने चालवून मोटार सायकलला धडक देवून पुतणी ऋतुजा हिचे डोक्यास गंभीर मार लागुन डावा कान तुटुन खाली पडण्यास व तिचे उजवे पायाचे मांडीवरुन ट्रॅक्टरचे चाक जावून गंभीर जखमी करण्यास कारणीभूत झाला होता व काकाच्या उजव्या गुडघ्याला मुक्कामार लागला होता. जखमी तरुणी वरती सोलापूर येथील खाजगी रुग्णांलयामध्ये उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली. उद्याची उच्चशिक्षित डॉक्टर तरुणीचा असा अपघाती झालेल्या मृत्यूमुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

 

 

वैराग प्रतिनिधी, आण्णासाहेब कुरूलकर