इंडोनेशियातील नर्सिंग होमला भीषण आग; १६ जणांचा होरपळून मृत्यू

इंडोनेशिया : इंडोनेशियातील उत्तर सुलावेसी प्रांताची राजधानी असलेल्या मनाडो शहरात एका नर्सिंग होममध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीत किमान १६ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनाडो शहरातील पाल दुआ जिल्ह्यातील ‘पँटी वेराधा दमाई’ नर्सिंग होममध्ये रविवारी रात्री ८:३६ वाजता आग लागली. घटनेची माहिती मिळताच मनाडो शहर प्रशासनाकडून तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे रात्री ९:३० वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात यश आले. उत्तर सुलावेसी प्रादेशिक पोलिसांचे जनसंपर्क प्रमुख अलम्स्याह पी. हसिबुआन यांनी सांगितले की, आगीत मृत्युमुखी पडलेल्या १६ जणांचे मृतदेह पोल्डा सुलुतच्या भयांगकारा रुग्णालयात ओळखीसाठी ठेवण्यात आले आहेत. मृतांची ओळख पटवून त्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. आगीची माहिती मिळताच पोलिस अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. परिसर सुरक्षित करण्यात आला असून बचाव कार्यात पोलिसांनी सक्रिय सहभाग घेतला. वाचलेल्यांना मनाडो शहर प्रादेशिक रुग्णालय आणि पर्माता बुंडा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांचे फॉरेन्सिक पथक घटनास्थळी तपास करत आहे. आगीचा प्रारंभ कसा झाला, याचा क्रम निश्चित करण्यासाठी प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी करण्यात येत आहे. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण इंडोनेशियात हळहळ व्यक्त केली जात आहे.