टोरांटो रथयात्रेत भाविकांवर अंडी फेकण्याचा प्रकार, भारत सरकारचा निषेध

टोरंटो (कॅनडा) :
कॅनडातील टोरंटो शहरात इस्कॉनच्या ५३व्या वार्षिक भगवान जगन्नाथ रथयात्रेदरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी भाविकांवर अंडीफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे रथयात्रेचा पवित्र उत्सव काही काळ तणावपूर्ण झाला. रथयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांनी रस्त्यावर भजन-कीर्तन करत भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा देवी यांच्या रथाला ओढत असताना ही अंडीफेक झाली. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत इंस्टाग्राम युजर संगना बजाज यांनी सांगितले की, कोणीतरी उंच इमारतीवरून अंडी फेकली. का? कारण आम्ही श्रद्धा ठेवतो? पण आम्ही थांबलो नाही.”

घटनेनंतर तीव्र निषेध
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत तीला घृणास्पद आणि निंदनीय” म्हटले. त्यांनी सांगितले की, भारताने कॅनडातील अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा ठामपणे मांडला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि बीजेडी प्रमुख नवीन पटनायक यांनी ट्विटरवर लिहिले की, ही घटना जगभरातील भाविकांसाठी आणि ओडिशातील लोकांसाठीही अत्यंत वेदनादायक आहे.”

भारतीय समुदायाचा संताप
भारतीय समुदाय आणि अनिवासी भारतीय संघटनांनीही या घटनेचा जोरदार निषेध केला असून कॅनेडियन सरकारने त्वरित आणि ठोस कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दरवर्षी हजारो भाविक सहभागी होणाऱ्या या रथयात्रेला उत्सवाचे स्वरूप असते. मात्र अशा प्रकारच्या हल्ल्यामुळे धार्मिक सहिष्णुतेला गालबोट लागल्याची भावना व्यक्त होत आहे.