कर्तव्यपथावर दिसली भारताची ताकद

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीतिल कर्तव्य पथावरील संचलनात देशाच्या एकूणच लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडले. हा सोहळा पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक सहभागी झाले होते. सर्व वृत्त वाहिन्यांसह youtube आणि समाजामद्यावर लाईव्ह प्रक्षेपण दाखवल्याने घरबसल्या देशवासीयांनी परेड पहिली.  

देश आज आपला ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रमुख पाहुणे इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांता आदी मान्यवर आणि असंख्य नागरिक उपस्थित होते. दिल्लीतील कर्तव्य पथावरील या सोहळ्यात जवानांकडून शानदार परेड सादर करण्यात आली. यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक रेजिमेंटला एक इतिहास आहे. रेजिमेंटमधील जवानांचा पराक्रम हा शौर्याचे प्रतिक आहे. 

कर्तव्य पथावर जाट रेजिमेंटने परेड सादर केली. या रेंजिमेंटला तब्बल २०० वर्षाचा इतिहास आहे. या रेजिमेंटचे नेतृत्व कॅप्टन अजय सिंह गरसा यांनी केले. जाट रेजिमेंटची स्थापना १७९५ साली कलकता मिलिशिया नावाने झाली. १८५९ साली ही रेजिमेंट नियमित इन्फंट्री बटालियनमध्ये रुपांतरित झाली. या रेजिमेंटने पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात आपले शौर्य दाखवले. फ्रान्स, मेसोपोटेमिया, उत्तर आफ्रिकेच्या युद्धात सक्रिय सहभाग घेतला. 

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नातून बेळगाव येथे १ ऑक्टोबर १९४१ साली महार रेजिमेंटची स्थापना झाली.या वर्षीच्या परेड मध्ये महार रेजिमेंटचे नेतृत्व कॅप्टन अमन कुमार सिंह यांनी केले. रेजिमेंटने अनेक सैन्याच्या असंख्य ऑपरेशन्समध्ये भाग घेतला आहे आणि मदत कार्य, राष्ट्र उभारणी आणि क्रिडा क्षेत्रातही आपले कौशल्य सिद्ध केले आहे. या रेजिमेंटमध्ये सध्या २१ नियमित इन्फंट्री बटालियन, तीन प्रादेशिक बटालियन, तीन राष्ट्रीय रायफल्स आणि टास्क फोर्सचा समावेश आहे. 

लाल रंगाच्या वर्दीमध्ये ब्रिगेड ऑफ गार्डसचे नेतृत्व कॅप्टन रविंद्र भारद्वाज यांनी केले. या रेजिमेंटला भारतीय सैन्याची पहली अखिल भारतीय ऑल क्लास रेजिमेंट होण्याचा मान मिळाला आहे. या रेजिमेंटने स्वातंत्र्य पूर्व काळापासून सर्व संघर्षांत योगदान दिले आहे. रेजिमेंटचे नायक जदुनाथ सिंह आणि लांस नायक अलबर्ट एक्का यांना सर्वोच्च बलिदानासाठी महावीर चक्राने सन्मानित केले गेले.