म्यानमारच्या ग्रस्तांसाठी भारताचा पुढाकार; 'ऑपरेशन ब्रह्मा' अंतर्गत पाठवली मदत

नविदिल्ली: म्यानमारमध्ये शुक्रवारी झालेल्या ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला. या धरणीकंपात एक हजारांहून अधिक जण मृत झाल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे संकटात सापडलेल्या म्यानमारच्या मदतीसाठी भारत सरसावले आहे.  ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत तातडीची मदत पाठवली आहे. म्यानमार मधील मंडाले हे शहर भूकंप केंद्रबिंदू असल्याने सर्वाधिक नुकसान झाले आहे. बर्माच्या स्टेट मीडिया  नुसार, या भूकंपात १ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २,३७६ लोक जखमी झाले आहेत. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने मृतांचा आकडा १० हजारांपेक्षा जास्त असण्याची भीती व्यक्त केली आहे. सध्या बचाव कार्य सुरू असून बेपत्ता ३० जणांचा शोध घेतला जात आहे. म्यानमारमधील या भीषण आपत्तीनंतर भारताने तत्काळ मदत पाठवली आहे. शनिवारी ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत १५ टन मदत साहित्य यांगूनला पाठवण्यात आले. भारतीय हवाई दलाच्या AC-130J विमानाने तंबू, स्लीपिंग बॅग, ब्लँकेट्स, अन्नपदार्थ, पाणी शुद्धीकरण यंत्र, सौर दिवे, जनरेटर सेट्स आणि औषधे यांसह मदत पोहोचवली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ‘X’ वर पोस्ट करत सांगितले"भारताने मानवतावादी दृष्टिकोनातून म्यानमारला मदतीची पहिली खेप पाठवली आहे. 'ऑपरेशन ब्रह्मा' सुरू आहे." भूकंपामुळे मोठे नुकसान भूकंपाचा परिणाम म्यानमारसह थायलंडमध्येही जाणवला. इमारती, पूल कोसळले, तसेच पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले. बचाव पथकांकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.