भारत-पाक तणाव शिगेला; सिंधू जल करार स्थगित, पाकिस्तानचा डाव उधळण्याची भारताची तयारी

नवी दिल्ली एप्रिल २६ : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव तीव्र झाला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी वाढीव वादग्रस्त वक्तव्ये करून वातावरण पेटवले आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचा काहीही सहभाग नसल्याचा दावा करताना त्यांनी भारतातील अल्पसंख्याकांचे नाव घेऊन अंतर्गत स्थितीवरही टीका केली आहे. त्यावर भारत सरकारने सर्वपक्षीय बैठक घेऊन पाकिस्तानविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे. हल्ल्यानंतर विरोधी पक्षांनीही सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहत एकमुखी पाठिंबा दर्शविला. याच बैठकीत पाकिस्तानला उत्तर देण्याच्या विविध पर्यायांवर चर्चा झाली. वॉटर स्ट्राइक’चा इशारा – सिंधू जल कराराला स्थगिती भारत सरकारने सिंधू जल कराराला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला असून, काही माध्यमांनी याला ‘वॉटर स्ट्राइक’ असे संबोधले आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानला पाण्याच्या बाबतीत मोठा आर्थिक आणि सामाजिक फटका बसू शकतो. जरी पाकिस्तान या निर्णयाला जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे, तरी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा मांडत भारत ही कारवाई समर्थनीय ठरवू शकतो. पाकिस्तानची कबुली आणि पळवाट ख्वाजा आसिफ यांनी एका स्थानिक पाकिस्तानी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत, पाकिस्तानने दीर्घकाळ भारताविरोधात दहशतवादाला समर्थन दिले आहे, अशी स्पष्ट कबुली दिली. मात्र, ही कबुली देताना त्यांनी अमेरिका, ब्रिटन व पश्‍चिम राष्ट्रांनाही यात सहभागी असल्याचा आरोप करून मखलाशी करण्याचा प्रयत्न केला. भारत सरकारने अशा वक्तव्यांकडे गांभीर्याने पाहून पाकिस्तानला अकल्पित उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. यावेळी सर्जिकल स्ट्राइकची पुनरावृत्ती होईल का, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.