भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, महिला टी-२० मालिका खिशात
भारतीय महिला क्रिकेट संघाने आपल्या दमदार कामगिरीचा
सिलसिला कायम राखत श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात ८ गडी राखून
एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी अजेय
आघाडी घेत मालिका आपल्या नावे केली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला भारतीय
गोलंदाजांनी पूर्णपणे रोखले. वेगवान गोलंदाज रेणुका सिंह हिने भेदक मारा करत ४
षटकांत २१ धावा देत ४ बळी घेतले. तर फिरकीपटू दीप्ती शर्मा हिने ४ षटकांत केवळ १८
धावा देत ३ फलंदाजांना बाद केले. या दोघांच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे श्रीलंकेचा
डाव अवघ्या ११२ धावांवर आटोपला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात
थोडी अडखळली. स्मृती मानधना (१) आणि जेमिमा रॉड्रिग्स (९) लवकर बाद झाल्या. मात्र, त्यानंतर शेफाली वर्मा हिने
जबरदस्त फलंदाजी करत सामना भारताच्या बाजूने झुकवला. शेफालीने अवघ्या २४ चेंडूत
अर्धशतक झळकावत ४२ चेंडूत नाबाद ७९ धावांची खेळी केली. तिच्या खेळीत ११ चौकार आणि
३ षटकारांचा समावेश होता. कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाबाद २१ धावा करत तिला
योग्य साथ दिली. भारताने हे आव्हान अवघ्या १४ षटकांत पूर्ण केले. विशेष म्हणजे,
या मालिकेतील तिन्ही सामने भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना जिंकले
आहेत. आता मालिकेतील चौथा सामना २८ डिसेंबर रोजी, तर पाचवा व
अंतिम सामना ३० डिसेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे.