कांद्याच्या दरात वाढ
.jpeg)
सोलापूर: दरवर्षीच्या तुलनेत यंदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याची आवक कमी असल्याने दरात वाढ झाली आहे. सध्या बाजारात कांदा प्रतिक्विंटल सरासरी 2100 ते 3500 रुपये दराने विक्री होत आहे. प्रतिकूल हवामानामुळे यंदा कांद्याचे उत्पादनात घट होत असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दरवर्षी जानेवारीत 500 ते 600 ट्रक कांद्याची आवक होत होती. यंदा ही आवक घटून सध्या दररोज 200 ते 280 ट्रकवर आली आहे. गुरुवारी 280 ट्रकमधून 28022 क्विंटल कांद्याची आवक झाली सरासरी दर 2100 रुपये तर उच्चांकी 4 हजारप्रमाणे कांद्याची विक्री झाली. महिनाभरापूर्वी कांद्याचे दर चार ते पाच हजार रुपये होते. परंतु नाशिक, अहिल्यानगर, बंगळुरू, हैदराबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक वाढल्याने सोलापुरातील कांद्याच्या दरात घसरण झाली होती. आता पुन्हा कांद्याच्या दरात सुधारणा झाल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. यंदा प्रतिकूल हवामान व अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्यांचा कांदा जागेवरच सडला आहे. त्यामुळे उत्पादन निम्म्याहून कमी येत आहे. सध्या सोलापूर बाजार समिती मधील कांद्याला दक्षिण भारतातील हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई कोलकाता आधी महानगरातून मागणी असल्याचे सांगण्यात आले.