सिंहगड रोडवरील नवीन उड्डाणपुलाचे उद्घाटन, पुणेकरांना मिळणार वाहतूक सोय

पुणे, ३० एप्रिल २०२५पुणेकरांसाठी वाहतुकीच्या अडचणींमधून दिलासा देणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. विठ्ठलवाडी कमान ते फनटाईम थिएटरदरम्यान बांधण्यात आलेल्या २१२० मीटर लांबीच्या या पुलामुळे सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरली मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, चंद्रकांत पाटील, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

वाहतुकीला दिलासा, विकासाला चालना

उद्घाटन सोहळ्यात बोलताना अजित पवार म्हणाले की, "या उड्डाणपुलामुळे राजाराम पुलाकडून वडगावकडे जाणाऱ्या वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. हा पूल पुण्याच्या पायाभूत विकासाला चालना देणारा ठरणार आहे." सुमारे ६१ कोटी रुपयांचा खर्च करून उभारलेल्या या पुलासाठी १०६ गर्डर्स बसवण्यात आले असून, २०२१ मध्ये याचे भूमीपूजन झाले होते. आता हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

अजित पवारांचा व्यस्त दिवस

पुण्यातील कार्यक्रमांची मालिका आटोपून अजित पवार आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. सकाळी साडेसहा वाजता त्यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीचे उद्घाटन केले. त्यानंतर सकाळी ७:१० वाजता सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन तर सकाळी ८ वाजता राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहणही पार पडले.