सोलापूरमध्ये उद्या 2 मार्च रोजी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने भव्य स्वच्छता अभियान

सोलापूर – डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 2 मार्च 2025 रोजी सोलापूर शहरात भव्य स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमात 4000 हून अधिक श्री सदस्य सहभागी होणार असून, शहरातील विविध प्रमुख बाजारपेठा, भाजी मंडई आणि महत्त्वाचे मार्ग येथे सकाळी 9 ते 11 दरम्यान स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.

समाजसेवेसाठी प्रतिष्ठानची पुढाकार - डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान पर्यावरण रक्षण, जल पुनर्भरण, वृक्षारोपण व संवर्धन, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक मदत आणि स्वच्छता अभियान यांसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या 82 वर्षांपासून प्रतिष्ठान समाज प्रबोधनाचे कार्य सातत्याने करत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन आणि आरोग्य जनजागृती यांसाठी प्रतिष्ठान विविध उपक्रम राबवते.

मोहीमेसाठी विशेष नियोजन- या स्वच्छता मोहिमेसाठी प्रतिष्ठानने 55 पेक्षा जास्त ट्रॅक्टर व ट्रॉली सज्ज केल्या आहेत. सर्व सहभागी सदस्यांना मास्क आणि हँड ग्लोव्हज प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच, महापालिकेच्या वतीने 40 घंटा गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

महापालिकेचे सहकार्य - या अभियानात महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबाशे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार आणि अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. प्रत्येक स्वच्छता मार्गावर महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम - ही स्वच्छता मोहीम केवळ शहर स्वच्छ करण्यासाठी नसून, स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी शहर घडवण्याचा संकल्प करावा, असे प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.