बागेश्वर धाममध्ये भिंत कोसळून भाविकाचा मृत्यू; धीरेंद्र शास्त्रींचे घरून उत्सव साजरा करण्याचे आवाहन

छतरपूर | मध्य प्रदेश:-
बागेश्वर धाम येथे पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे दुर्घटना घडली
आहे. धामजवळील एका खाजगी ढाब्याची भिंत कोसळल्याने एक भाविक जागीच ठार झाला,
तर १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर छतरपूर येथील
रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भात छतरपूरचे मुख्य
वैद्यकीय अधिकारी (CMHO) डॉ. आर. पी.
गुप्ता यांनी माहिती दिली. “आज सकाळी मुसळधार पावसामुळे ढाब्याची भिंत कोसळली.
काही भाविक जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात
आणण्यात आले आहे. एकाचा मृत्यू झाला असून, १–२ जण गंभीर आहेत,”
असे त्यांनी सांगितले.
🟣 गुरुपौर्णिमा
उत्सवासाठी धीरेंद्र शास्त्री यांचे भाविकांना आवाहन
बागेश्वर धामचे पीठाधीश पंडित
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी भाविकांना विनंती केली आहे की, गुरुपौर्णिमा उत्सव घरीच साजरा करा. ते
म्हणाले, “दररोज लाखो भाविक धामात येत आहेत. पावसाचे प्रमाण
वाढले आहे आणि व्यवस्थापनावर ताण आहे. त्यामुळे कृपया आपल्या घरीच गुरुपौर्णिमा
साजरी करा. तुमच्या श्रद्धेला आमचा नमस्कार.” या आवाहनाचे मुख्य कारण भाविकांची
सुरक्षितता आणि धामातील व्यवस्था सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी
स्पष्ट केले.