संतोष देशमुख खून प्रकरणात महत्त्वाचा खुलासा; धनंजय देशमुखांनी वाल्मिक कराडलाही केला होता फोन

सोलापूर: संतोष देशमुख खून प्रकरणात गुरुवारी (10 एप्रिल) तिसरी सुनावणी होणार असून, या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सरकारी पक्षाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्याआधी पीडितांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा जबाब समोर आला असून, त्यामध्ये त्यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. धनंजय देशमुख यांनी त्यांच्या भावाचे अपहरण झाल्यानंतर आरोपी विष्णू चाटे याच्यासह वाल्मिक कराडलाही फोन केल्याचे आपल्या जबाबात नमूद केले आहे. ही बाब प्रथमच उघड झाली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “माझ्या भावाला सोडा, काही करू नका,” अशा शब्दांत त्यांनी सतत विनवण्या केल्या होत्या. विष्णू चाटेवर गंभीर आरोप धनंजय देशमुख यांच्या जबाबात नमूद केल्याप्रमाणे, त्यांनी 9 डिसेंबर रोजी 20 पेक्षा अधिक वेळा विष्णू चाटेला फोन करून संतोष देशमुख यांची सुटका करण्याची विनंती केली होती. मात्र, चाटे वारंवार “दहा मिनिटात सोडतो, वीस मिनिटात सोडतो” असे सांगत वेळकाढूपणा करत होता. याच दिवशी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. कराडलाही दिला होता फोन विशेष म्हणजे, धनंजय देशमुख यांनी आरोपी वाल्मिक कराडलाही फोन केल्याचा उल्लेख त्यांच्या जबाबात आहे. ही माहिती पहिल्यांदाच समोर आली असून, या प्रकरणात कराडची भूमिका तपासाच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे. आवादा एनर्जी प्रकल्पावरून सुरु झालेला वाद जवळपास एकाच प्रकल्पासंदर्भात खंडणीच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. आरोपी विष्णू चाटे याने संतोष देशमुख यांना “खंडणीच्या आड येऊ नकोस” अशी धमकी दिली होती, असेही धनंजय देशमुख यांनी जबाबात म्हटले आहे. तक्रारही नोंदवली होती धनंजय देशमुख यांनी अपहरणाची तक्रार केज पोलीस ठाण्यात दिली होती. अपहरणाच्या वेळी त्यांच्या मित्रांकडून त्यांना मारहाणीची माहिती मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.