मावळमध्ये बेकायदेशीर शिकारीचा पर्दाफाश, वनविभागाची धडक कारवाई
.jpeg)
मावळ, ता. १३ मे : मावळ तालुक्यातील तिकोणा गावात वनविभागाने केलेल्या धडक कारवाईत बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सुखमित हरमित सिंग भुतालिया (वय २६) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून सुमारे ५२ किलो संशयित वन्यप्राण्याचे मांस, दोन शस्त्रास्त्रे, जिवंत व वापरलेले काडतुसे तसेच शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. गोपनीय माहितीवरून धाड वनविभागाला मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरून मंगळवारी (१३ मे) तिकोणा गावातील “सिंग बंगला” येथे धाड टाकण्यात आली. कारवाई दरम्यान आरोपीकडून बेकायदेशीर शिकार झाल्याचे स्पष्ट झाले. कायदेशीर कारवाई व तपासणी या प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ चे कलम ९ व ५१ अंतर्गत वनगुन्हा नोंदवण्यात आला असून, आरोपीविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. जप्त मांसाचा नमुना नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव संशोधन केंद्रात न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. शस्त्रास्त्रांबाबत मालकी व परवाना याची चौकशी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने केली जाणार आहे. प्रशासनाची कारवाईत सजगता ही कारवाई उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक वनसंरक्षक मंगेश टाटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात प्रकाश शिंदे, सीमा पलोडकर, गणेश मेहत्रे, संदीप अरुण आणि शेलके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वनविभागाचे आवाहन वनविभागाने नागरिकांना बेकायदेशीर शिकार, व्यापार किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने जवळच्या वनकार्यालयात किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. “वन्यजीव व जंगलांचे संरक्षण ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असेही विभागाने स्पष्ट केले आहे.