हिंदू सुरक्षित राहिले तर मुस्लिमही सुरक्षित राहतील: योगी आदित्यनाथ

लखनौ, दि. २५ मार्च -
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदू आणि मुस्लिमांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा विधान केले आहे. "हिंदू सुरक्षित असतील, तर मुस्लिमही सुरक्षित राहतील," असे ते म्हणाले. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

योगी आदित्यनाथ म्हणाले, "100 हिंदू कुटुंबांमध्ये एखादे मुस्लिम कुटुंब सर्वात सुरक्षित असते. त्यांना त्यांच्या धार्मिक परंपरा पाळण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. मात्र, 100 मुस्लिम कुटुंबांमध्ये 50 हिंदू सुरक्षित राहतील का?" असे प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, "बांगलादेश आणि पाकिस्तान हे याचे ज्वलंत उदाहरणे आहेत. अफगाणिस्तानात देखील हिंदूंवरील अत्याचार हे जागतिक सत्य आहे. त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे.**"

2017 नंतर दंगली थांबल्या
योगी आदित्यनाथ यांनी 2017 मध्ये भाजपच्या सत्तेत आल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये दंगली थांबल्या असल्याचे सांगितले. "पूर्वी हिंदू आणि मुस्लिम दोघांचीही घरे आणि दुकाने जळत असत. मात्र, भाजप सत्तेत आल्यापासून अशा घटनांवर आळा बसला आहे," असे ते म्हणाले.

सनातन धर्माचे गौरवगान
योगी आदित्यनाथ यांनी सनातन धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्म असल्याचे सांगत त्याचा गौरव केला. "सनातन धर्माच्या अनुयायांनी कधीही इतरांचा धर्मांतरासाठी छळ केला नाही. इतिहास साक्षी आहे की हिंदू राजांनी कधीही त्यांची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी इतरांवर अत्याचार केले नाहीत," असे त्यांनी नमूद केले.