मी वारंवार भूमिका बदलतो, हा फेक नॅरेटिव्ह : राज ठाकरे

मुंबई : राज्याच्या राजकारणात मी वारंवार भूमिका बदलतो, अशी टीका होऊ लागली आहे. माझ्यामागे ईडी लावल्याने मी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला. हा फेक नॅरेटिव्ह आहे. कोहिनूर मिल प्रकरणात आम्ही केवळ पार्टनर होतो, असा खुलासा करत सगळ्यांनी स्वार्थासाठी भूमिका बदलल्या, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पक्षांवर केला. ते वरळी येथे पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत 4 ते 5 जागा मिळतील, असे वाटत असताना अजित पवार यांच्या गटाचे 42 आमदार निवडून आले. शरद पवार यांच्या पक्षाचे 9 खासदार निवडून येतात. तर आमदार 10 कसे निवडून येऊ शकतात. लोकसभा निवडणुकीनंतर 4 महिन्यांत निकाल वेगळा कसा लागला? निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात सन्नाटा पसरला होता. लोक विचारत होते की, ‘इतना सन्नाटा क्यों है भाई’, निवडून आलेल्या उमेदवारांनाही विश्वास वाटत नाही. त्यांच्यापैकी काही जणांचे मला फोन आले. 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या अजित पवारांना भाजपने सोबत घेऊन मंत्रिमंडळात टाकले. त्यांना तर ते जेलमध्ये टाकणार होते. याचा अर्थ आम्हाला समजला नाही. आदर्श घोटळ्यातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना सोबत घेऊन खासदार केले. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर म्हणाले होते की, आता मला शांत झोप लागत आहे. हिमंता बिश्वा शर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर त्यांना भाजपमध्ये घेऊन मुख्यमंत्री केले. शिवसेना प्रजा समाजवादी, मुस्लीम लीग काँग्रेससोबत होती. परिस्थितीनुसार विरोधी पक्ष भूमिका बदलतात. राज्याच्या राजकारणात नुसता चिखल झाला आहे. त्यांनी केले तर प्रेम आणि आम्ही केले तर दुष्कर्म, असा टोलाही त्यांनी लगावला. आता कोणत्याही गोष्टी करू नका. पैसे फुकट घालवू नका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येईल तेव्हा खर्च करा, असा सल्ला त्यांनी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांना यावेळी दिला. लवकरच पक्षात एक आचारसंहिता येणार आहे. सगळ्यांनी तीच गोष्ट केली जाईल, पदांची नावेही बदलली जातील. निवडणुकीत पराभव आणि विजय हे सुरू असतात. खचलेल्या लोकांचे नेतृत्व मला करायचे नाही. माझ्यासोबत राहायचे तर ठाम राहा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केले.