"मी वेडा नाही!" – रडणाऱ्या विद्यार्थ्याचे हंबरडे अमेरिकन अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षित

अमेरिकेतील इमिग्रेशन धोरणांविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान, नेवार्क विमानतळावर घडलेली घटना प्रचंड चर्चेत आली आहे. एका भारतीय विद्यार्थ्याला हातकड्या घालून जमिनीवर लोटल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या विद्यार्थ्याची अमानुष वागणूक पाहून भारतीय समुदायामध्ये संतापाची लाट उसळली आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योगपती कुणाल जैन यांनी हा व्हिडिओ रविवारी पोस्ट केला. त्यांनी लिहिलं, “नेवार्क विमानतळावर मी एका भारतीय विद्यार्थ्याला गुन्हेगाराप्रमाणे वागवताना पाहिलं. तो रडत होता, मदतीसाठी ओरडत होता, पण अधिकारी त्याला वेडा असल्याचा आरोप करत जबरदस्ती करत होते.” या घटनेनंतर भारतीय दूतावासाने तत्काळ कारवाई केली असून, अधिकृत निवेदनात त्यांनी म्हटलं, “आम्हाला सोशल मीडियावर आलेल्या पोस्टद्वारे घटनेची माहिती मिळाली आहे. आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत आणि संबंधित नागरिकाला मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत.” या घटनेने लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण केला आहे. अनेकांनी अमेरिकन इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याआधीही अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यात भारतीय नागरिकांवर अन्याय झाला होता. कुणाल जैन यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनाही या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. “हा विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी आणि स्वप्नपूर्तीसाठी आला होता, त्याला वेडा ठरवून अशा प्रकारे वागवणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” असं जैन म्हणाले.