हैदराबाद : केमिकल कारखान्यात भीषण स्फोट; १० ठार, २० हून अधिक जखमी

तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील पाटण चेरू मंडळातील सिगाची केमिकल्स इंडस्ट्रीमध्ये आज भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे कारखान्यात मोठी आग लागली आणि परिसरात एकच धावपळ उडाली. वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत किमान १० जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच २० हून अधिक कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटावेळी कारखान्यात मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. अचानक मोठा आवाज होऊन सगळीकडे धूर आणि आगीचे लोळ पसरले. काही कामगार जीव वाचवण्यासाठी धावत बाहेर आले, तर काहीजण आत अडकले.

स्फोटाचे संभाव्य कारण
अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रिअॅक्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने स्फोट झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. 
घटनास्थळी दोन अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी उपस्थित आहे.

सुरक्षा नियमांचे उल्लंघन?
या कारखान्यात सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याची चौकशीही अधिकारी करत आहेत. दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.