पंढरपूरमध्ये चंदनउटी पूजेस भव्य प्रतिसाद; मंदिर समितीला ३५ लाखांचे उत्पन्न

पंढरपूर | उन्हाळ्याच्या कडाक्यापासून श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तींना शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी गुढीपाडव्यापासून मृग नक्षत्रापर्यंत चंदनउटी पूजेचे आयोजन केले जाते. यंदा १३ जून रोजी या पूजेची पारंपरिक सांगता करण्यात आली. मंदिर समितीचे सदस्य आणि अधिकारी यांच्या हस्ते सांगता पूजा पार पडली. विशेष म्हणजे यंदा प्रथमच ही पूजा ऑनलाईन बुकिंगद्वारे भाविकांसाठी खुली करण्यात आली होती, आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. उत्पन्नात मोठी वाढ चंदनउटी पूजेमुळे मंदिर समितीला सुमारे ३५ लाख १३ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. ही पूजा थेट विठ्ठल आणि रुक्मिणीमातेला उन्हाचा त्रास कमी व्हावा या हेतूने केली जाते. स्थान: श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंढरपूर प्रमुख उपस्थिती: अ‍ॅड. माधवीताई निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, शकुंतला नडगिरे, पांडुरंग बुरांडे, संदीप कुलकर्णी आदी विशेष भोजन व्यवस्था: संत तुकाराम भवन अन्नछत्रामध्ये सुमारे २००० ते २५०० भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यंदा ऑनलाईन प्रणालीमुळे देशभरातून भाविकांनी सहभाग घेतला. ही नोंदणी भाविकांच्या सोयीसाठी पुढील वर्षांपासूनही सुरू ठेवण्याचा मानस मंदिर समितीने व्यक्त केला आहे.