हाऊसफुल ५ ट्रेलर प्रदर्शित – विनोदाचा धमाका आणि मर्डर मिस्ट्री एकत्र!

मुंबई – प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा हाऊसफुल ५ चा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. या वेळी केवळ कॉमेडी नाही, तर एका गूढ मर्डर मिस्ट्रीसह विनोदाचा धमाका पाहायला मिळणार असल्याचे ट्रेलरमधून स्पष्ट होत आहे. चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ यांच्यासारख्या मातब्बर कलाकारांचा समावेश आहे. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, नरगिस फखरी आणि सोनम बाजवाचा देखील विशेष सहभाग असून, ट्रेलरमध्ये त्यांची झलकही आकर्षक आहे. कथानकानुसार, रंजीत डोबरियाल यांच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान क्रूझवर खून होतो. यानंतर संपत्तीवरून सुरु होणारा वारसदाराचा खेळ, हव्यास, आणि गोंधळ यामुळे प्रेक्षकांना खळखळून हसवत ठेवतो. मात्र, हसण्याच्या फोडणीसोबतच अनेक थरारक ट्वीस्ट आणि टर्न्सही पाहायला मिळतात. हाऊसफुल या फ्रँचायझीचा हा पाचवा भाग असून, 2010 पासून या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. यापूर्वीचे चारही भाग सुपरहिट ठरले असून, प्रेक्षक आता ५ जूनला प्रदर्शित होणाऱ्या या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.