मॉर्निंग वॉकला गेलेल्या पतीच्या अनुपस्थितीत घरफोडी; चाकूचा धाक दाखवत महिलेवर हल्ला

बार्शी : शहरातील कासारवाडी रस्त्यावर यशोदा पार्कमध्ये राहणारे ज्येष्ठ नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना तिघा जणांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवला. पत्नीला जखमी करून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, उषा चांदणे (वय 41) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी पहाटे सव्वाचार वाजता घडली. उषा चांदणे यांचे पती सेवानिवृत्त असून, नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यांनी घराला बाहेरून कुलूप लावले आणि कुलपालाच चावी ठेवली होती. याच संधीचा फायदा घेत तिघा चोरट्यांनी घरात प्रवेश केला. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सव्वाचार वाजता एक चोरटा घरातील कपाट उघडण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच वेळी एकजण चाकू घेऊन तिच्या समोर उभा राहिला, तर तिसरा चोरटा बेडरूमजवळ दबा धरून होता. अचानक जागी झालेल्या महिलेने त्यांना पाहून आरडाओरडा केला. या वेळी घरात असलेल्या तिच्या दोन नात्या आणि मुलगीही घाबरून जाग्या झाल्या. चोरट्यांनी तिला गप्प बसण्यास सांगितले आणि तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने धाडसाने चोरट्याच्या हातातील चाकू पकडला. मात्र, चोरट्यांनी जबरदस्तीने मंगळसूत्र काढून घेतले आणि इतर दागिने व रोख रक्कम लुटून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले. पुढील तपास शहर पोलिस करत आहेत.