नाशिकमध्ये भीषण अपघात; ब्रेक फेल ट्रकने इकोला चिरडले, चौघांचा जागीच मृत्यू
नाशिक-पेठ महामार्गावरील सावळघाट येथे मंगळवारी
सायंकाळी भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या ट्रकने पुढे जात असलेल्या इको कारला
मागून जोरदार धडक दिल्याने कार समोरील ट्रक आणि मागील ट्रक यांच्या मध्ये अडकून
अक्षरशः चिरडली गेली. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मारुती इको (GJ 15 CR 5659)
नाशिकहून पेठच्या दिशेने जात होती. सावळघाटातील तीव्र उतारावर मागून
येणाऱ्या ट्रक (MH 04 GF 8901) चे ब्रेक अचानक
निकामी झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने इकोला जोरदार धडक दिली. धडकेच्या
वेगामुळे इको कार पुढे असलेल्या ट्रक (NL 01 AC 1929) वर आदळली आणि दोन्ही ट्रकांमध्ये दबली. या अपघातात इको कारचा पूर्ण
चक्काचूर झाला. घटनास्थळीच दोन पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला. गंभीर
जखमी झालेल्या दोघांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,
उपचारादरम्यान आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या चार
झाली. मृत आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, अपघाताची
माहिती मिळताच पेठ आणि दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून
अपघाताचे नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास सुरू करण्यात आला आहे. या अपघातामुळे
काही काळ नाशिक-पेठ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक
सुरळीत करून पुढील तपास सुरू ठेवला आहे.