कोल्हापुरात भीषण अपघात – भरधाव चारचाकीची विद्यार्थिनींना धडक, एका मुलीचा मृत्यू

कोल्हापूर | 25 जुलै 2025:
कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुकली (ता. करवीर) येथे गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता एक धक्कादायक अपघात घडला. भोगावती महाविद्यालय सुटल्यानंतर बसथांब्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थिनींवर एक भरधाव चारचाकी कार धडकली. या अपघातात प्रज्ञा दशरथ कांबळे (वय 18, रा. कौलव) या बीएस्सी प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तर चार विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या.

सदर वाहनाने थेट विद्यार्थिनींच्या घोळक्यात घुसून त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर चालकाने वाहन थांबवले नाही. मात्र, विद्यार्थ्यांनी पाठलाग करून ठिकपुर्ली फाट्याजवळ त्याला पकडले. मोटारीतून चार अल्पवयीन मुले पळून गेली, तर चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

जखमींची नावे:

  • अस्मिता अशोक पाटील (कौलव)
  • श्रावणी उदय सरनोबत (कसबा तारळे)
  • श्रेया वसंत डोंगळे (घोटवडे)
  • पेरणा शिवाजी माने (आवळी बु.)

सर्व जखमींना भोगावती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रज्ञा कांबळे यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

गावात शोककळा:
प्रज्ञाच्या मृत्यूने कौलव गावावर शोककळा पसरली आहे. तिचे वडील दशरथ कांबळे हे शाळेतील शिपाई, तर आई ग्रामपंचायत सदस्या आहेत. हुशार आणि मनमिळावू प्रज्ञाने नुकताच बीएस्सीमध्ये प्रवेश घेतला होता. तिच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण परिसर हळहळला आहे.