लारीच्या भीषण धडकेत बीएसएफ जवानासह दोघांचा मृत्यू

विजयपूर जिल्ह्यातील निडुगुंडी शहरात बुधवारी सकाळी भीषण साखळी अपघात झाला. गुजरातहून बंगळुरूच्या दिशेने जात असलेल्या (क्र. JG 06 AU 5073) लारीने अति वेगात आणि निष्काळजीपणे वाहनांना धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान मौनेश खुबप्पा राठोड (वय ३५) आणि अँब्युलन्स चालक रितेशकुमार (वय ५०) यांचा समावेश आहे. मौनेश राठोड हे बागलकोट जिल्ह्यातील कालगी तांडा येथील रहिवासी असून, ते आलूर तांड्याला पत्नीला भेटून पुन्हा सैन्यात रुजू होण्यासाठी निघाले होते. निडुगुंडी बस स्थानकासमोर त्यांच्या मोटरसायकलला लारीने जोरदार धडक दिली, ज्यामुळे ते जागीच ठार झाले. यानंतर त्याच लारीने ताळिकोटे-वास्को बसला धडक दिली. सुदैवाने बसमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, पुढे जाऊन लारीने उत्तर प्रदेशातील (UP 83 AT 8108) अँब्युलन्सला जोरात धडक दिली. यात चालक रितेशकुमार यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून निडुगुंडी पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली असून, संबंधित लारी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षदर्शींनी लारीच्या अति वेग आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे स्पष्ट केले आहे.