शिवसेना नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; ऑगस्टमध्ये अंतिम फेरी
.jpeg)
नवी दिल्ली : दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्षाच्या नाव आणि
धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. न्या.
सूर्यकांत आणि न्या. बागची यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने
स्पष्ट केले की, मुख्य याचिकेवरच चर्चा होईल आणि ऑगस्ट
महिन्यात यावर सुनावणी घेण्यात येईल. उद्धव ठाकरे यांनी १० दिवसांपूर्वी सुप्रीम
कोर्टात अर्ज दाखल करून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या
प्रकरणातील तात्पुरत्या निर्णयाच्या धर्तीवर धनुष्यबाण चिन्हावर आदेश मागितले
होते. त्या अर्जावर एकनाथ शिंदे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी
विरोध नोंदवला. उद्धव ठाकरेंची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मांडली. न्यायालयाने
स्पष्ट केले की, आता वारंवार अर्ज न करता, मुख्य प्रकरणावरच सुनावणी होईल. पुढील २-३ दिवसांत ऑगस्टमधील नेमकी तारीख
जाहीर केली जाणार आहे. ऑगस्टमध्ये सुनावणी झाली, तर
सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत निकाल येऊ शकतो, असे ज्येष्ठ वकील
सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले की, हे प्रकरण जवळपास २ वर्षांपासून प्रलंबित असून, आता
त्याचा अंतिम सोक्षमोक्ष लावणे गरजेचे आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ
शिंदेंकडेच राहणार की पुन्हा उद्धव ठाकरेंना मिळणार, यावर या
वर्षाअखेरीस निर्णय होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे आगामी स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या निवडणुकांवरही परिणाम होणार असून, सध्या
न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे पूर्वीप्रमाणेच स्थिती कायम राहणार असल्याचे संकेत
दिले गेले.