हरियाणात तरुणीची हत्या – सुटकेसमध्ये मृतदेह फेकून देणारा आरोपी अटकेत

हरियाणा : हरियाणातील रोहतक येथे हिमानी नरवाल या तरुणीची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सचिन या आरोपीला अटक केली आहे. सचिन आणि हिमानी यांची ओळख फेसबुकवरून झाली होती. सचिन विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. तपासादरम्यान, आरोपी सचिन वारंवार हिमानीच्या घरी जात असल्याचे समोर आले आहे. २७ फेब्रुवारीच्या रात्री ९ वाजता सचिन हिमानीच्या घरी गेला आणि तिथेच थांबला. दुसऱ्या दिवशी दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणात सचिनने हिमानीला तिच्याच दुपट्ट्याने बांधून मोबाईल चार्जरच्या वायरने गळा दाबून हत्या केली. हाणामारीत सचिनच्या हातालाही दुखापत झाली. त्यानंतर त्याने हिमानीचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवला आणि तिची अंगठी, सोन्याचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप एका बॅगेत भरून तिची स्कूटी घेऊन गावी निघून गेला. पोलिसांच्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजता सचिन हिमानीच्या घरी परतला. त्याने बाहेर स्कूटर पार्क करून एका ऑटोची व्यवस्था केली. रात्री १० ते ११ दरम्यान, त्याने हिमानीचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून ऑटोने सांपला परिसरात फेकला आणि नंतर बसने पळून गेला. १ मार्च रोजी रोहतकमध्ये एका सुटकेसमध्ये महिला मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासानंतर मृतदेह हिमानी नरवालचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तपासासाठी आठ पथके तयार केली असून, सचिनला अटक करण्यात आली आहे. चौकशीत सचिनने दावा केला आहे की तो हिमानीसोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि तिने त्याच्याकडून लाखो रुपये घेतले होते. तसेच, अधिक पैशांसाठी ती त्याला ब्लॅकमेल करत होती, असा त्याचा आरोप आहे. मात्र, या हत्येमागील नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही.