पालकमंत्री यांच्याकडून सर्व नागरिकांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

सोलापूर : विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला सोलापूर जिल्हा उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात चौफेर प्रगती करत असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 76 वा समारंभानिमित्त पोलीस आयुक्त मुख्यालय पोलीस परेड ग्राउंड येथे सकाळी 9.15 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल उगले तेली, शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर शहर मध्य चे आमदार देवेंद्र कोठे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्यासह सर्व विभाग प्रमुख तसेच स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक व अन्य मान्यवर नागरिक उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आज रोजी पर्यंत सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 लाख 20 हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 10 लाख 55 हजार अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. तसेच राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी शासनाने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आज रोजी पर्यंत लेक लाडकी योजनेअंतर्गत 6 हजार 144 लाभार्थी बालिकांना लाभाच्या पहिल्या टप्प्याची रक्कम प्रति बालिका 5 हजार रुपये प्रमाणे 3 कोटी 7 लाख 20 हजार लाभार्थी बालिका व मातेच्या संयुक्त बँक खात्यावर जमा करण्यात आलेली आहे, अशी माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली.