न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात भाजप नेत्यांचा हात

मुंबई: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात भाजप नेत्यांचा हात असल्याची टीका राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. या बाबत बोलताना उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले की, मुंबईतील न्यू इंडिया बँक लुटली गेली असून त्यामागे सर्व भाजपचे लोक आहेत. जनतेचा पैसा लुटणारे सगळे बिल्डर मग ते मेहता, जैन आणि भाजपचा एक कदम अशी सगळी भाजपची माणसे आहेत. आता कुठे गेले मुलुंडचे पोपटलाल? शेकडो कोटींना बँक लुटली गेली. आता का बोलत नाहीत? भाजपाच्या लोकांनी बँक लुटली म्हणून बोलत नाही?, असा सवाल देखील राऊत यांनी नाव न घेता भाजप नेते किरीट सोमय्या यांना विचारला.आरबीआयकडून न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई करण्यात आली होती. या बँकेचा महाव्यवस्थापक व लेखा प्रमुख हितेश मेहता याने 122 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात मेहता आणि धर्मेश जयंतीलाल पौन यांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणावर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

मुंबईमध्ये न्यू इंडिया बँक लुटली गेली असून त्यामागे सर्व भाजपचे लोक आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. जॉर्ज फर्नांडिस यांनी ही बँक स्थापन केली होती. बँकेतून लुटला गेलेला पैसा हा गरीबांचा, सामान्य माणसांचा नाही का? आता तुमच्याकडे कागदपत्र, पुरावे नाहीत का? आता ईडीकडे का नाही जात? आता तुम्ही पत्रकार परिषद होत नाहीत? भाजपचे आमदार यामध्ये अडकले आहेत. त्यांच्या दबावाखाली कर्जवाटप झाले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच, ज्या बिल्डरांना पैसे मिळाले ते भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबधित असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, या बँक घोटाळ्यात भाजप आमदार राम कदम यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. त्यांनी मॅनेजरवर दबाव टाकून भाजपशी संबंधित लोकांना कर्ज देण्यास सांगितले, असा आरोप केला जात आहे. मात्र, राम कदम यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. माझ्याबाबत वक्तव्य करताना जबाबदारीने बोला, अन्यथा कारवाईला तयार राहा. मी स्वतः बँकेचा एक खातेदार असून, माझेच पैसे अडकले आहेत. या घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही आणि उलट फसलेल्या हजारो लोकांना मदत करण्याची माझी भूमिका असल्याचे राम कदम म्हणाले.