H-1B व्हिसा अर्जदारांसाठी अमेरिकन दूतावासाचा मोठा इशारा; रिशेड्युल मुलाखतीला जुन्या तारखेला गेल्यास प्रवेश नाकारला जाणार
भारतामधील अमेरिकन दूतावासाने H-1B आणि H-4 व्हिसा अर्जदारांसाठी एक महत्त्वाचा सल्ला
आणि इशारा जारी केला आहे. ज्या अर्जदारांच्या व्हिसा मुलाखती रिशेड्युल करण्यात
आल्या आहेत, त्यांनी जुन्या अपॉइंटमेंट तारखेला दूतावास
किंवा वाणिज्य दूतावासात येऊ नये, असे स्पष्टपणे सांगण्यात
आले आहे. अन्यथा, त्यांना प्रवेश नाकारला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. अमेरिकन दूतावासाने सोशल मीडियावर दिलेल्या
माहितीनुसार, अनेक व्हिसा मुलाखती आता मार्च 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असून, त्यामुळे
प्रतीक्षा कालावधी ३ ते ४ महिन्यांनी वाढला आहे. दूतावासाने स्पष्ट केले आहे की,
जर अर्जदाराला अपॉइंटमेंट रिशेड्युल झाल्याचा ईमेल मिळाला असेल,
तर नवीन तारखेची माहिती मिळेपर्यंत जुन्या तारखेला येणे निरर्थक
ठरेल. दूतावासाने म्हटले आहे की, “जर तुम्हाला तुमची व्हिसा
अपॉइंटमेंट पुन्हा शेड्युल झाल्याचा ईमेल मिळाला असेल, तर
मिशन इंडिया तुमच्या नवीन अपॉइंटमेंटसाठी मदत करेल. मात्र, जुन्या
तारखेला आल्यास दूतावासात प्रवेश दिला जाणार नाही.”
🔴 सोशल मीडिया अकाउंट्सची कडक तपासणी
दरम्यान, अमेरिकेने H-1B आणि
H-4 व्हिसा अर्जदारांसाठी एक नवीन नियम लागू केला आहे. १५
डिसेंबर २०२५ पासून अर्जदारांचे फेसबुक, इंस्टाग्राम,
एक्स (ट्विटर), लिंक्डइन, स्नॅपचॅट यांसह सर्व सोशल मीडिया अकाउंट्सची सखोल तपासणी करण्यात येणार
आहे. या तपासणीसाठी अधिक वेळ लागणार असल्याने डिसेंबरमधील अनेक व्हिसा मुलाखती
पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दूतावासाने अर्जदारांना त्यांच्या सर्व सोशल मीडिया
अकाउंट्सवरील गोपनीयता सेटिंग्ज तातडीने ‘Public’ करण्याचा
सल्ला दिला आहे. कोणतीही पोस्ट, फोटो, स्टोरी
किंवा टिप्पणी खाजगी असल्यास व्हिसा मुलाखतीवर परिणाम होऊ शकतो, असेही सांगण्यात आले आहे.
🇮🇳 भारतीय अर्जदारांवर सर्वाधिक परिणाम
हा नियम सर्व देशांतील नागरिकांना लागू असला, तरी H-1B व्हिसा घेणाऱ्या भारतीयांची संख्या
सर्वाधिक असल्याने भारतातील आयटी व्यावसायिकांवर याचा मोठा परिणाम होणार आहे.
दरवर्षी हजारो भारतीय H-1B व्हिसावर अमेरिकेत कामासाठी
जातात. याआधी ट्रम्प प्रशासनाने नवीन H-1B व्हिसासाठी $100,000
(सुमारे ₹8.5 कोटी) अतिरिक्त शुल्क जाहीर केले
होते. अनेक ग्रीन कार्ड आणि नागरिकत्व अर्जही थांबवण्यात आले होते. आता सोशल
मीडिया तपासणी आणि मुलाखती पुढे ढकलल्यामुळे अमेरिकेत जाण्याची प्रक्रिया
भारतीयांसाठी अधिक कठीण झाली आहे.